नदीला पूर येणे किंवा उन्हाळ्यात पाणी खालावणे ही बाब आपल्याला काही नवी नाही. काही नद्या तर निव्वळ पावसाळीच असतात. एरवी त्या कोरड्या, ठणठणीत असतात. मात्र, कॅनडात एक नदी आजपर्यंत कधीही अशी आटली नव्हती. आता मात्र अवघ्या चारच दिवसांमध्ये ती कोरडी पडल्याने संशोधकही बुचकळ्यात पडले आहेत! हा जागतिक तापमानवाढीचा परिणाम असल्याचे काहीजणांचे म्हणणे असून काही लोक याला ‘रिव्हर पायरेसी’ (नदीची चोरी) म्हणत आहेत.
कास्कावुल्श ग्लेशियरपासून निघणारी ही स्लिम्स नावाची नदी नावाप्रमाणेच ‘स्लिम’ आहे. तिची रुंदी अवघी 150 मीटर आहे. शेकडो वर्षांपासून वाहणारी ही नदी आता गायब झाली आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार हवामानातील बदलामुळे ग्लेशियरमधील बर्फ वेगाने वितळले. त्यामुळे या नदीचा प्रवाह इतका वेगवान झाला की त्याने आपली दिशाही बदलली. त्यामुळे नदीच्या मूळ प्रवाहाचा मार्गच गायब झाला व तो कोरडा दिसू लागला. सध्या ही नदी अलास्काच्या खाडीकडे वाहत आहे. एका भूवैज्ञानिकाने सांगितले की, त्याने या नदीच्या ठिकाणाला भेट दिली त्यावेळी ती पूर्णपणे आटली होती. अशा प्रकारचे स्थित्यंतर होण्यास एरवी बराच काळ लागतो.