संगणक क्षेत्रातील आघाडीवर असलेली चिनी कंपनी लिनोवो भारतात व्यवसाय वृद्धीसाठी नवा उत्पादन प्रकल्प स्थापन करण्याचा विचार करीत आहे. सध्या कंपनीचा पुद्दुचेरी येथे एक स्वतंत्र उत्पादन प्रकल्प आहे. ‘आयबीएम‘च्या पर्सनल संगणक व्यवसायाचे अधिग्रहण केल्यानंतर कंपनीकडे या प्रकल्पाची मालकी हस्तांतरित झाली होती. परंतू आता कंपनीला तेथील सरकाकडून मिळणारी कर सवलत संपल्याने कंपनी नव्या प्रकल्पाच्या शोधात असल्याची माहिती खासगी सुत्रांनी दिली आहे. लिनोवोच्या पुद्दुचेरी प्रकल्पात वर्षाला 15 लाख पर्सनल संगणक तयार केले जातात.
कंपनीच्या या निर्णयाचा ‘मेक इन इंडिया‘ प्रकल्पाला फायदा होणार आहे. नव्या प्रकल्पासाठी कंपनी तेलंगणा, आंध्र प्रदेश व गुजरातचा विचार करीत आहे. शिवाय, कंपनीने छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशातूनही पर्याय खुला ठेवला आहे. सध्या कंपनीची तेथील राज्य सरकारांशी बोलणी सुरु आहे.
लिनोवो भारतात संगणक क्षेत्रात कंपनी आघाडीवर आहे. 2015 वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीचा संगणक बाजारपेठेत 25.3 टक्के वाटा होता. परंतू आता कंपनी आपल्या स्मार्टफोन व्यवसायाच्या विस्तारासदेखील उत्सुक आहे. सध्या कंपनी बाहेरुन स्मार्टफोन तयार करुन घेते. नव्या प्रकल्पात कंपनी स्मार्टफोन्सचेदेखील उत्पादन करणार आहे. सध्या कंपनीचे दरवर्षी 96 लाख स्मार्टफोन्स विकले जातात.
लिनोवोच्या व्यवसायाची गेल्या वर्षभरात दोन अब्ज डॉलरची उलाढाल झाली आहे. कंपनीच्या एकुण उत्पन्नात पर्सनल कम्प्युटर आणि मोबाईल व्यवसायाची प्रत्येकी 45 टक्के हिस्सेदारी आहे. कंपनीचे ऊर्वरित उत्पन्न टॅब्लेट आणि सर्व्हर व्यवसायातून आहे.