Latest News

पुण्यासह सहा केंद्रांवर प्रथमच कसोटी सामने

सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपासून भारतीय क्रिकेट हंगामाला प्रारंभ होत असून, धरमशाला, पुणे आणि रांचीसह सहा नव्या कसोटी केंद्रांवर प्रथमच कसोटी सामने रंगणार आहेत. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यावरील चौथी कसोटी पुण्यात होणार आहे. याचप्रमाणे मुंबईकर क्रिकेटरसिकांना भारत-इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीचा आनंद लुटता येणार आहे. 
भारतीय क्रिकेट हंगामाचे अतिशय व्यस्त वेळापत्रक असून, यात १३ कसोटी, ८ एकदिवसीय आणि ३ ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात कसोटी केंद्रांचा दर्जा लाभलेल्या राजकोट, विशाखापट्टणम, पुणे, धरमशाला, रांची आणि इंदूर या ठिकाणी प्रथमच कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अजय शिर्के यांनी दिली. 
गुरुवारी मुंबईत झालेल्या दौरे आणि वेळापत्रक समितीच्या बैठकीत नव्या केंद्रांवर न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्याविरुद्धचे कसोटी सामने होणार असल्याचे निश्चित करण्यात आले. भारतीय संघ अनुक्रमे न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध या वर्षी मालिका खेळणार आहे. 
त्यानंतर पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यानंतर बांगलादेशचा संघ कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाल्यावर प्रथमच भारतात एकमेव कसोटी सामना खेळणार आहे.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.