इंटरनेटच्या माध्यमातून विविध प्रकारांच्या व्यवहारासाठी ग्राहकांचा वाढता ओढा लक्षात घेत आणि विशेषत: इंटरनेटवरून आर्थिक व्यवहारांसाठी भारतीय ग्राहकांत निर्माण झालेल्या जागरूकतेच्या पार्श्वभूमीवर आता विमा उद्योगही आॅनलाइन जाण्याच्या तयारीत आहे, तसेच विमा कंपन्यांनी स्वत:च्या वेबसाइटसोबतच ई-कॉमर्स वेबसाइटच्या माध्यमातूनही विविध उत्पादनांची विक्री करण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या विमा कंपन्यांच्या काही ठरावीक उत्पादनांची विक्री आॅनलाइन पद्धतीने होते, पण ही प्रक्रिया मर्यादित आणि ठरावीक योजनांपुरतीच मर्यादिच आहे.
विमा उत्पादनांच्या आॅनलाइन विक्रीचा एक प्रस्ताव विमा नियामक प्राधिकरणाने तयार केला असून, यानुसार ग्राहकांना विम्याची उत्पादने आॅनलाइन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आराखडा तयार केला आहे. विमा उत्पादनांच्या विक्रीमध्ये विमा कंपन्या, विमा एजंट अशा विमा विक्रीतील सर्वच घटकांचा समावेश आहे. याकरिता, इरडाने स्वतंत्र नियमावली तयार केली आहे.
या नियमावलीच्या अंतर्गत विमा कंपन्या आणि विमा एजंटना आॅनलाइन प्लॅटफॉर्म विकसित करून विमा उत्पादनांची खरेदी करावी लागेल, तसेच या माध्यमातून होणाऱ्या सर्व योजनांच्या विक्रीची, तसेच त्या योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी ही सर्वस्वी विमा कंपन्यांची असेल, असेही इरडाने स्पष्ट केले आहे.