Latest News

‘पर्यावरण संवर्धना’ ची वेगळी करिअर वाट


पर्यावरणाचे प्रश्‍न आपल्या दैनंदिन गोष्टींपैकी बहुतांश गोष्टींशी संबंधित असतात. याचमुळे गेल्या काही काळापासून पर्यावरणाशी संबंधित करिअरला महत्त्व येत आहे. पर्यावरणासाठी काही काम करायचं असल्यास आपल्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
आजच्या काळामध्ये सगळ्यात जास्त चर्चा होणारं क्षेत्र म्हणजे पर्यावरण. नैसर्गिक साधनांचा आपण चुकीच्या पद्धतीनं वापर करतो आणि याचमुळे आपल्या आजूबाजूच्या निसर्गावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती होताना दिसत आहे. मागील शतकामध्ये झालेल्या औद्योगिक प्रगतीमुळे निसर्गाची  जास्त हानी झाली. या सगळ्यामुळे ‘पर्यावरण संवर्धन’ हा सध्याच्या काळातील एक महत्त्वाचा प्रश्‍न ठरला आहे.  
•एन्व्हायरमेंटल रिसर्च :
एन्व्हायरमेंटल रिसर्च म्हणजेच ‘पर्यावरण अनुसंधान’, हे गेल्या सध्याच्या काळातील सगळ्यात जास्त संधी असणारं करिअर आहे. याचा ‘स्कोप’ही प्रचंड आहे. यामध्ये प्राणीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, वनस्पतीशास्त्र, वन्यजीव व्यवस्थापन, जंगलांचा अभ्यास अशा विविध विषयांचा समावेश होतो. या करिअरमध्ये आपल्याला पर्यावरणाशी संबंधित अनेक प्रश्‍नांचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होते. यात प्रयोगशाळेमध्ये काम करताना विविध  रसायनांचा किंवा प्रदूषणासाठी कारणीभूत असणार्‍या घटकांचा सूक्ष्म जीवांवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास केला जातो. प्रयोगशाळेबाहेर काम करताना वनस्पतींचा आणि इतर गोष्टींचा अभ्यास करताना तुलनेनं जास्त वेळ काम करावं लागतं. याचा अभ्यास करणारे ‘रिसर्चर’ अनेकदा विविध चाचण्या घेऊन, तसेच औद्योगिकीकरणाचा अभ्यास करून आणि या औद्योगिकीकरणाचा पर्यावरणावर कसा आणि काय परिणाम होत आहे, हे शोधून पर्यावरणाच्या प्रश्‍नावर लेखन करतात. या प्रकारच्या लेखनाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कायम मागणी असते. या अभ्यासक्रमासाठी सामान्यत: वनस्पतीशास्त्र, पर्यावरणशास्त्र  जीवशास्त्र किंवा यासंबंधीच्या क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रम केलेल्यांना संधी दिली जाते. या क्षेत्रात काम करण्याच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. शैक्षणिक संस्था, शासकीय संस्था, निमशासकीय संस्थांमध्ये अशा प्रकारचे रिसर्चर काम करू शकतात. तसंच, औद्योगिक क्षेत्रामध्येही ‘पर्यावरणविषयक सल्लागार’ म्हणून काम करण्याचीही उत्तम संधी अलीकडच्या काळात मिळत आहे.

•एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग :
ही अभियांत्रिकीमधील पोटशाखा आहे. अलीकडच्या काळामध्ये याची मागणी बर्‍यापैकी वाढली आहे. यामध्ये शास्त्र शाखा आणि अभियांत्रिकीच्या विविध विषयांचा अभ्यास केला जातो. पाणी पुरवठा, टाकाऊ पदार्थांच्या विल्हेवाटीची  यंत्रणा, घन कचर्‍याचं व्यवस्थापन, औद्योगिक कचर्‍याचं व्यवस्थापन, रेडिएशनपासून सुरक्षा आणि आण्विक कचर्‍याचं नियंत्रण, पर्यावरणावरील दुष्परिणामांचा अभ्यास, औद्योगिक सुरक्षा या प्रकारचा अभ्यास करणे हा या शाखेचा हेतू आहे. भारतातील बर्‍याच शैक्षणिक संस्थांमध्ये पर्यावरण अभियांत्रिकीचे पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. सामान्यत: शास्त्र शाखेतील किंवा अभियांत्रिकीचा पदवीधारक या अभ्यासक्रमासाठी पात्र असतो. हा अभ्यासक्रम  केलेल्यांना राज्य आणि राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डांमध्ये, विविध महानगरपालिकांमध्ये, पाणी पुरवठा विभाग किंवा विविध औद्योगिक  संस्थांमध्ये संधी मिळू शकतात. 
• पर्यावरण कायदा : पर्यावरण कायदा ही आजच्या काळातील एक उपयुक्त शाखा मानली जाते. प्रत्येक देशांतील पर्यावरणाचे कायदे कडक असतात आणि जगभरातील अनेक देशांमध्ये याचं काटेकोर पालनही केलं जातं. पर्यावरण कायदा ही कायद्याच्या अभ्यासक्रमातील एक शाखा आहे. पर्यावरणाशी संबंधित कायदा हा पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन, नैसर्गिक स्रोतांची हानी रोखण्यासाठी काम करते. पर्यावरण कायदेतज्ज्ञ हे पाणी, हवा, ध्वनी, जमीन यांचं प्रदूषण, स्वच्छता या विषयांवर काम करतो. तसेच, वन्य जीवांचं संरक्षण, नैसर्गिक साधनसंपत्तीचं संरक्षण, यासंबंधातील गुन्हे यांच्याबाबतही काम करतो. 
भारतातील बहुतांश विधि महाविद्यालयांमध्ये पर्यावरण कायदा हा विषय पदवीच्या अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट आहे. तसेच, कमी कालावधीचे आणि एखादा विषय स्पेशल घेऊन पदविकेचीही सोय असते. पर्यावरण कायद्यामधील तज्ज्ञ वकिलांना अनेक शासकीय आणि निम शासकीय संस्थांमध्ये संधी मिळते. तसेच, कायदेविषयक खटल्यांना सामोरं जाण्यासाठी आणि त्यासंबंधित मदत करण्यासाठी अनेक औद्योगिक संस्था, उद्योगही या क्षेत्रातील तज्ज्ञांची नेमणूक करतात. 
•एन्व्हायरमेंटल जर्नालिझम :
पत्रकारितेकडे तरुणांचा ओढा दिवसेंदिवस वाढतच आहे. या माध्यमातून समाजाच्या अनेक प्रश्‍नांना हात घालता येतो. यामुळे तसंच ग्लॅमरमुळे पत्रकारितेकडे येणार्‍यांची संख्या वाढते. पण अनेकदा  ठराविक साच्यामधील बातमीदारीमध्ये अडकल्यानं बाकीच्या महत्त्वाच्या क्षेत्रांकडे दुर्लक्ष होतं. पर्यावरण  पत्रकरिता म्हणजे वन्य जीव किंवा वनस्पतीशास्त्रासंबंधातील बातम्या होत नाहीत. पर्यावरणाच्या विविध समस्या पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्याची गरज असते. पर्यावरणावर आघात करणारे किंवा त्याच्यावर परिणाम करणारे घटक कुठले? याचं ज्ञान असणं गरजेचं असतं. या क्षेत्राची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. एका बाजूला पर्यावरणाशी संबंधित प्रश्‍नांचे शास्त्रीय दृष्टिकोनातून वार्तांकन असते तर दुसर्‍या बाजूला स्थानिक पातळीवरील पर्यावरणाची धोरणं, पर्यावरण कायद्याचा भंग शोधण्याचा प्रयत्न करावा लागतो.
पर्यावरण प्रश्‍नांची आंतरराष्ट्रीय स्तरावर सतत चर्चा होत असते. तसंच, ग्लोबल वॉर्मिंग, औद्योगिकीकरणाचा पर्यावरणावरील आघात याविषयांवर शास्त्रीय संशोधनही पुढे येत असतं. याचाही सतत मागोवा घेत राहणंही गरजेचं असतं. ‘पर्यावरण पत्रकारिता’ असा खास अभ्यासक्रम शिकवला जात नाही. नेहमीच्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमामध्येच या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. तसंच, व्यावसायिक पत्रकारांसाठी अनेक ठिकाणी छोटे कोर्सेस किंवा कार्यशाळांचं आयोजन केलं जातं. समाजाला या विषयी माहिती देण्याचं काम या पत्रकारांकडूनच होत असल्यानं या मार्गानंही पर्यावरणाशी संबंधित काम आपण करू शकतो. पर्यावरण वाचवणं ही काळाची गरज आहे. त्याच्यात होणार्‍या कुठल्याही बदलाचा थेट परिणाम आपल्यावर होत असतो. याचमुळे पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करणं सगळ्यांच्या हिताचं आहे.

- अनिकेत प्रभुणे (पुढारी )

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.