भारताचा एकमेव वैयक्तिक ऑलिंपिक विजेता व आगामी रिओ ऑलिंपिकसाठी भारताचा ध्वजवाहक म्हणून निवड झालेला निशाणेबाज अभिनव बिंद्राने शुक्रवारी रिओ ऑलिंपिकनंतर खेळातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. ३३ वर्षीय बिंद्राने २००८ च्या पेचिंग ऑलिंपिक्समध्ये निशाणेबाजीत पुरूष १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली होती. यंदा तो पाचव्यावेळी ऑलिंपिकमध्ये सहभागी होत आहे. या स्पर्धेसाठी तो भारताचा सदिच्छादूतही आहे.
शुक्रवारी अभिनव म्हणाला, गेली २० वर्षे मी खेळतो आहे आणि खेळाचा पुरेपर आनंद लुटला आहे. या खेळाने मला मोठे समाधानही दिले आहे. २० वर्षांचा हा प्रवास मी ८ ऑगस्ट रोजी संपविण्याचा निर्णय घेतला आहे. हा सर्व काळ अतिशय आनंदाचा होता. यंदा भारतासाठी ध्वजवाहक बनण्याचा मान मिळाला आहे हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान आहे. अर्थात कोणत्याही खेळाडूसाठी ऑलिंपिकमध्ये देशाचे ध्वजवाहक होणे हा सन्मानच आहे. आम्ही यंदा स्टेडियममध्ये मार्च करू तेव्हा अब्जावधी लोकांचा पाठिंबा आम्हाला मिळेल याची खात्री आहे.