अमेरिकेत फ्लोरिडा प्रांतात आॅरलँडो शहरात समलैंगिक नाइट क्लबमध्ये घुसून हल्लेखोराने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ५० जण ठार, तर ५३ जण जखमी झाले आहेत. पोलिसांशी झालेल्या चकमकीत हा हल्लेखोर मारला गेला असून हे ९/११ नंतरचे सर्वांत मोठे दहशतवादी कृत्य असल्याचे मानले जात आहे. इसिस या दहशतवादी संघटनेने आपल्या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही हे दहशतवादी कृत्य आणि द्वेषातून केलेला हल्ला असल्याचे म्हटले आहे. तसेच या हल्ल्याच्या पाठीशी असणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
ओमर मीर सिद्दिकी मतीन असे हल्लेखोराचे नाव असून, तो मूळचा अफगाणिस्तानचा आणि सध्या अमेरिकेचा नागरिक आहे. रात्री २ वाजताच्या सुमारास नाइट क्लबच्या बाहेरील अधिकाऱ्याची आणि त्याची चकमक झाली. मतीन त्यानंतर क्लबमध्ये गेला. क्लबमध्ये त्यावेळी ३०० हून अधिक समलिंगी लोक होते. अंधाधुंद गोळीबार सुरू केला. यात एकतृतीयांश लोकांना गाळ्या लागल्या. त्यानंतर त्याने काही जणांना ओलीस ठेवले. स्पेशल वेपन्स अँड टॅक्टिस टीमने हल्लेखोर मतीन अखेर ठार केले.