आफ्रिका खंडातील घाना, आइव्हरी कोस्ट आणि नामीबिया या तीन देशांच्या दौऱ्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज प्रयाण केले. राष्ट्रपतींचा हा विदेश दौरा सहा दिवसांचा आहे.
राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या भारतासाठी महत्त्वाच्या असलेल्या या तीन देशांमध्ये लोकशाहीची पाळेमुळे रुजली असून, येथील राजकीय व्यवस्था मजबूत मानली जाते. या देशांबरोबर असलेल्या संबंधांना अधिक मजबूत करत व्यापार वाढविण्यासाठी राष्ट्रपतींच्या या दौऱ्यावेळी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
भारताच्या राष्ट्रपतींचा घाना आणि आइवरी कोस्ट या देशांचा हा पहिलाच दौरा आहे, तर नामीबियाला भारताचे राष्ट्रपती पहिल्यांदाच भेट देणार आहेत. राष्ट्रपती पदावर येण्यापूर्वी मुखर्जी यांनी घाना आणि आइवरी कोस्ट या देशांना भेटी दिल्या आहेत.