दहशतवादापासून संपूर्ण जगाला धोका असून, आमच्या शेजारीच दहशतवादाचे केंद्र आहे. राजकीय स्वार्थासाठी दहशतवादाचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे, असा थेट हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पाकिस्तानचे नाव न घेता हल्ला चढविला.
अमेरिकी संसदेच्या संयुक्त सभागृहापुढे बुधवारी भाषण करताना त्यांनी भारताची दहशतवादाबद्दलची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आज जगालाच दहशतवादापासून गंभीर धोका आहे. मात्र काही देश राजकीय स्वार्थासाठी दहशतवादाचा वापर करीत आहेत. दहशतवाद्यांना काही देशांत पोसले जात आहे. त्यांच्यावर आता कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे. सर्वांनी मिळूनच दहशतवादाचा बिमोड करायला हवा.
भारतीय वेळेनुसार रात्री साडेआठ वाजता मोदी यांच्या भाषणास प्रारंभ झाला. त्यांनी मिस्टर स्पीकर या शब्दांनी भाषणाची सुरुवात करण्यापूर्वी सिनेट सदस्यांनी उभे राहून टाळ््यांचा कडकडाट करत मोदींचे स्वागत केले. मोदींनी हात हलवून सर्वांना अभिवादन करत त्यांच्या स्वागताचा स्वीकार केला.
मोदी सुरुवातीला भारत आणि भारतीय संस्कृती याविषयी बोलले. त्यानंतर सुमारे पाऊण तासांच्या भाषणात त्यांनी उभय देशातील संबंध, भारताची प्रगती यासह अनेक मुद्यांना स्पर्श केला.
भारत-अमेरिकेच्या संबंधांची वीण उलगडताना त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोमधील भाषणाचा उल्लेख केला. मार्टिन ल्युथर किंग यांनी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या शिकवणीपासून प्रेरणा घेतली होती. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अमेरिकी राज्यघटनेचा प्रभाव होता, असे त्यांनी सांगितले. दहशतवादाला (पान १२ वर)(पान १ वरून) धर्म नसतो किंवा चांगला वा वाईट असा दहशतवादही नसतो, असे स्पष्ट करून दहशतवाद, सायबर गुन्ह्यांचे मोठे आव्हान संपूर्ण जगासमोर उभे असल्याचे मोदी यांनी सांगितले.
मोदी यांनी दहशतवादापासून असलेल्या धोक्याचा उहापोह केला. त्यात त्यांनी लष्कर-ए-तोएबा, इसिस यासारख्या संघटनांनी चालविलेल्या दहशतवादी कारवायांचा उल्लेख करून भारत हा उपखंडात सर्व आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज असल्याची ग्वाही दिली. यावेळी त्यांनी अफगाणिस्तानबद्दल अमेरिकेने स्वीकारलेल्या भूमिकेची प्रशंसाही केली.
दोन्ही देशांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आपले नागरिक आणि सैनिक गमावले आहेत. मुंबई हल्ल्याच्या वेळी अमेरिका भारताच्या बाजूने उभा राहिला. अमेरिकेची ही साथ भारत कधीही विसरणार नाही, असेही त्यांनी सांगितले. भारत-अमेरिका संबंध प्रगतीशिल भविष्याचा पाया असून दोन्ही देशातील युती आशियापासून आफ्रिका आणि हिंद महासागरापासून प्रशांत महासागरापर्यंत शांतता,समृद्धी आणि स्थैर्याची वाहक बनू शकते. ही युती वाणिज्याचे सागरी मार्ग आणि सागरातील वाहतुकीच्या स्वातंत्र्य अबाधित राखू शकते. भारत हिंद महासागरात आपली जबाबदारी पार पाडत आहे, असेही मोदी म्हणाले.