गुगल या आघाडीच्या सर्च इंजिनला अलाहाबाद सत्र न्यायालयाने फौजदारी खटल्याबाबत नोटीस बजावली आहे. गुगलवर "टॉप 10 क्रिमिनल्स ऑफ द वर्ल्ड‘ (जगातील 10 अव्वल गुन्हेगार) असा सर्च टाकला असता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र येत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
सुशीलकुमार मिश्रा या वकिलांनी याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश महताब अहमद यांनी सोमवारी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारताचे प्रमुख या दोघांना नोटीस बजावली आहे. मिश्रा यांनी या प्रकरणी मुख्य दंडाधिकारी यांच्याकडेही संपर्क साधला होता. त्यांनी सर्वप्रथम स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत गुगलने यात बदल करण्याची मागणी केली होती. या संदर्भात त्यांनी गुगलच्या कॅलिफोर्निया माउंटन व्हिव येथील मुख्यालयाला पत्रही लिहिले होते. परंतु त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.