Latest News

नैसर्गिक नको, सिझेरिअनच प्रसूती करा ( सिझेरियनची कारणे )

"प्रसववेदना तिला सहन होणार नाहीत. तिला प्रचंड त्रास होईल. त्यातून तिच्या जिवाला धोका होण्याची शक्‍यता आहे... त्यामुळे नैसर्गिक प्रसूतीची वाट न बघता सिझेरिअनच्या ‘कन्सेंट फॉर्म‘वर लवकर सही करा," ही वाक्‍ये आहेत शहरातील एका प्रख्यात प्रसूतीगृहामधील डॉक्‍टरांची. "जिवाला धोका‘ हे शब्द ऐकताच पुढचा विचार न करता दुसऱ्याच क्षणी "कन्सेंट फॉर्म‘वर नातेवाइकांनी सही केली आणि काही वेळातच एका गोंडस मूलाचा जन्म झाल्याची माहिती प्रसूती कक्षातून बाहेर आली. 
या आणि अशा घटना वारंवार आपल्या परिसरात घडताना दिसतात. नऊ महिने चांगला आहार, व्यायाम आणि गर्भावस्थेतील सर्व काळजी व्यवस्थित घेऊनही शेवटी सिझेरिअनच करावे लागले, असे सांगणारे अनेक जण आपल्याला अवती-भोवती दिसतात. प्रसूतीच्या शेवटच्या क्षणी काही-तरी गुंतागुंत होते आणि सिझेरिअन करण्याशिवाय डॉक्‍टरांपुढे पर्याय राहत नाही, असे मतही वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.


सिझेरिअनला प्राधान्य 
शहरांमधील खासगी रुग्णालयांमध्ये प्रसूती म्हणजे सिझेरिअन असे नवीन समीकरण समोर येत आहे. शहरात वेगाने बदलणारी जीवनशैली आणि आहार पद्धतीच्या परिणामांमुळेही हे समीकरण निर्माण होत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. सिझेरिअन करण्यामागे काही अंशी आर्थिक कारणे असल्याचेही काही वैद्यकीय तज्ज्ञांनी मान्य केले. नैसर्गिक प्रसूतीपेक्षा सिझेरिअन करण्यातून रुग्णालयाला पंधरा ते वीस हजार रुपये जास्त शुल्क जमा होते. त्यामुळे प्राधान्य सिझेरिअनला देण्याचा विचारही रुग्णालयाकडून केला जातो, असेही त्यांनी सांगितले. राज्यात 2005-06 मध्ये झालेल्या "राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण- 3‘ मध्ये सिझेरिअनचे प्रमाण 22.3 टक्के होते. ते आता शहरात 33.1 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहे. सरकारी रुग्णालयांमधील हे प्रमाण 11.6 वरून 13.1 टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे.

सरकारी रुग्णालयात पायाभूत सुविधांचा अभाव 
खासगी प्रसूतीगृहांच्या तुलनेत सरकारी रुग्णालयांमध्ये आव्हानात्मक आणि गुंतागुंतीच्या प्रसूती करण्यासाठी आवश्‍यक पायाभूत सुविधांचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयांपेक्षा खासगी क्षेत्रात सिझेरिअनचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे, अशी माहिती शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये या ठिकाणी गुंतागुंतीच्या प्रसूती होत नाहीत. तेथून पुढच्या सरकारी दवाखान्यात रुग्णाला पाठविले जाते. पण, रुग्ण त्याच शहरातील खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होतो. तेथे प्रसूतीसाठी सिझेरिअन करावे लागते, त्यातूनही खासगीमधील हे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.


दृष्टिक्षेपात राज्यातील सिझेरिअन (सर्व आकडे टक्‍क्‍यांमध्ये)
खासगी रुग्णालयातील सिझेरिअनचे प्रमाण .............. शहरी ....... ग्रामीण ...... एकूण
सरकारी रुग्णालयांमधील सिझेरिअनचे प्रमाण ........... 38.4 ...... 27.5 ...... 33.1
(स्रोत - राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2015-16)

खासगी रुग्णालयातील जनरल वॉर्डमधील प्रसूतीदर (चार दिवसांसाठी)
सिझेरिअन ......... 65 ते 70 हजार रुपये
नैसर्गिक प्रसूती .... 40 ते 45 हजार रुपये

सिझेरियनची कारणे 
  • सुरक्षित प्रसूतीवर भर देतात, जोखीम पत्करण्याची तयारी नसते 
  • रक्तदाब वाढणे आणि मधुमेह 
  • आईच्या जिवाला धोका 
  • प्रसूतीपूर्व सेवेचा दर वाढल्याने सुरवातीपासूनच सिझेरिअनचे नियोजन केले जाते 
  • जननमार्ग पुरेसा मोठा असेलच असे नाही, त्यामुळे सिझेरिअन करावे लागते 

शहरांमध्ये मुलींच्या लग्नाचे वय वाढल्याने पहिली प्रसूती उशिरा होते. त्यातून वैद्यकीय गुंतागुंत वाढण्याचा धोका असतो. तसेच, प्रसूतीच्या काळात उच्च रक्तदाब, मधुमेह असल्यास सिझेरिअन हीच सुरक्षित प्रसूती असते. त्यातून आई आणि बाळा दोघांचेही जोखीम कमी होते. त्यामुळे सुरक्षित प्रसूतीसाठी सिझेरिअनचे प्रमाण वाढले. आधुनिक काळात सिझेरिअनचा त्रास कमी करण्यात यश आल्याने त्याचे प्रमाण वाढत आहे.
- डॉ. वैजयंती पटवर्धन, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ

सौजन्य - सकाळ दैनिक

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.