लिस्बेन :
जगभरातील प्रत्येक देशात सध्या प्रचंड रहदारी वाढली आहे. या समस्येने त्रस्त नसलेला एकही देश शोधूनही सापडणार नाही, असेच जणू सद्यस्थितीत तरी दिसते. मात्र, ट्रॅफिक जामवर पर्याय शोधण्यात विशेषज्ज्ञ लोक काम करत आहेत. याचाच एक भाग म्हणून पोर्तृगालमधील एक स्टार्ट अप कंपनीने उडत्या कारचा पर्याय शोधला आहे. यात या कंपनीने बर्यापैकी यशही मिळविले आहे.
पोर्तुगालची ही कंपनी लवकरच उडत्या कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. उल्लेखनीय म्हणजे उडत्या कारगाड्यांची चाचणीही या कंपनीने यशस्वीपणे पार पाडली आहे. या कारला अगदी विमानासारखीच तीन चाके असतील. तर वरच्या भागात हेलिकॉप्टरसारखे दोन फोल्डिंग पंख असतील. कारच्या मागील भागात प्रोपेलर बसवण्यात आले असून ते हवेत कारला पुढे नेण्यात मदत करतात. या अत्याधुनिक उडत्या कारमध्ये हवाई आणि रस्ते वाहनांसंबधीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे.
कारमध्ये 100 अश्वशक्तीचे दोन इंजिन बसवण्यात आले आहेत. याशिवाय ही कार आकाशात तासाला 177 कि. मी. वेगाने तर रस्त्यावर 161 कि. मी.च्या वेगाने धावणार आहे. कारला रस्त्यावरून हवेत जाण्यासाठी दहा मिनिटे लागतात. याशिवाय कारमध्ये पायलटशिवाय आणखी दोन प्रवासी आरामात बसू शकतात. याच्या बेसिक मॉडेलची किंमत चार लाख डॉलर्स म्हणजे 2.57 कोटी रुपये इतकी आहे.