Latest News

सूर्याच्या म्हणजे मातृताऱ्याच्या गतीवर परिणाम करणारा बाहय़ग्रह शोधण्यात यश

अलीकडेच तप्त गुरूसारख्या बाहय़ग्रहाचा शोध लागला असून, एचएटीएस १८बी हा ग्रह इतका शक्तिशाली असतो, की तो त्याच्या मातृताऱ्याच्या परिवलनावर गुरुत्वीय शक्तीने परिणाम करतो. हा ग्रह त्याच्या ताऱ्याभोवती फिरतानाच इतर ताऱ्यांच्या परिवलनावर परिणाम करतो. 
हा तप्त ग्रह २१०० प्रकाशवर्षे दूर असून, त्याच्या ताऱ्याभोवती कमी काळात फिरतो व तो अधिक्रमणाच्या मदतीने दिसून येतो. हा नवा बाहय़ग्रह त्याच्या ताऱ्याभोवती ०.८४ दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. त्याची त्रिज्या गुरूच्या १.३४ पट जास्त आहे व त्याचे वस्तुमान गुरूपेक्षा दुप्पट आहे. जास्त वस्तुमान व कमी कक्षीय काळ यामुळे तारा व ग्रह यांच्यात गुरुत्वीय शक्तीचा जास्त परिणाम होतो. 
एचएटीएस १८ या ग्रहामुळे तारे-ग्रह यांच्यातील आंतरक्रिया जाणून घेण्यास मदत होते. गुरुत्वीय, चुंबकीय व प्रारणांमुळे हे परिणाम होत असतात, असे संशोधक गटाचे प्रिन्स्टन विद्यापीठातील प्रमुख कालोयान पेनेव यांनी सांगितले. एचएटीएस १८ हा ग्रह त्याच्या ताऱ्यावर प्रभाव टाकतो. मोठा वायुरूप ग्रह व तारे यांच्यातील आंतरक्रिया यातून कळू शकतील. 
हबल व नासाच्या स्पिटझर दुर्बिणीच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे संशोधन करण्यात आले असून, बाहय़ग्रहांच्या वातावरणातील विविधता त्यामुळे प्रथमच झाली आहे. गुरूसारख्या ग्रहांचा वैज्ञानिकांनी अभ्यास केला असून त्यात एकूण दहा ग्रह आहेत. 
इतर ताऱ्यांभोवती एकूण २००० ग्रह सापडले असून, त्यातील काही गुरूसारखे वायुरूप आहेत. ते ताऱ्यांच्या इतके जवळ असतात, की त्यामुळे ते खूप तापलेले असतात. एक्सेटर विद्यापीठाचे डेव्हिड सिंग यांनी सांगितले, की बाहय़ग्रहांची तुलना करण्यात प्रथमच यश आले आहे. ढगमुक्त ग्रहांमध्ये पाण्याची शक्यता जास्त दिसून आली. 
तप्त गुरूसारख्या ग्रहांमध्ये पाणी असल्याचे फार अंधूक संकेत दिसतात. जे ग्रह ताऱ्यांच्या फार जवळ असतात त्यांच्यात पाण्याची शक्यता कमी असते, असे कॅलिफोर्निया विद्यापीठातील जोनाथन फॉर्टनी यांनी सांगितले. ‘नेचर’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. 

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.