क्रीडा लवादाकडे पाचवेळा ग्रँडस्लॅम जिंकणारी रशियन टेनिसतारका मारिया शारापोव्हाने आपल्यावरील बंदीविरोधात अपील केले असून यापूर्वी २९ वर्षीय शारापोव्हावर आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेने उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याप्रकरणी दोन वर्षांची बंदी लादली आहे. तिने मेल्डोनियम या बंदी असलेल्या उत्तेजकाचे अंश जानेवारीत ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेदरम्यान घेतलेल्या उत्तेजक चाचणीत आढळून आले होते. त्यानंतर तिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
आपल्यावरील निलंबन पूर्णपणे मागे घ्यावे किंवा त्याचा कालावधी कमी करावा, अशी विनंती शारापोव्हाने आपल्या अर्जातून केली आहे, असे क्रीडा लवादाने यावेळी नमूद केले. या विनंती अर्जावर १८ जुलै रोजी सुनावणी होऊ शकेल, असे लवादाने म्हटले असून यामुळे शारापोव्हाला आगामी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याची आशा वाटते. ऑलिम्पिक टेनिस स्पर्धेसाठी रशियाने आपल्या संघात शारापोव्हाला यापूर्वी प्राधान्याने स्थान दिले आहे.