बंगळूर - भारताने आज स्वदेशी बनावटीच्या प्रशिक्षक विमानाची आज यशस्वी चाचणी घेतली. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) तयार केलेल्या या हिंदुस्तान टर्बो ट्रेनर-40 (एचटीटी-40) या विमानाच्या उड्डाणावेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित होते.
तीनही सेवा दलांच्या प्रशिक्षणार्थी जवानांना पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने हे विमान तयार करण्यात आले आहे. विविध कारणांमुळे त्याच्या चाचणीला उशीर झाला होता. भारतीय हवाई दल किमान 70 एचटीटी-40 विमाने खरेदी करण्याची शक्यता आहे. तसेच, ही संख्या दोनशेपर्यंत वाढविण्याचे सूतोवाचही पर्रीकरांनी केले आहेत. ही विमाने शस्त्रधारीही असतील. या विमानांना प्रत्यक्ष सेवेत दाखल करण्याची परवानगी 2018 पर्यंत मिळू शकते. हे विमान एचपीटी-32 या विमानाची जागा घेईल.
आज झालेल्या या यशस्वी चाचणीनंतर आनंदित झालेल्या पर्रीकर यांनी "एचएएल‘च्या तंत्रज्ञांचे कौतुक केले. चाचणीनंतर स्वत: विमानाच्या कॉकपीटमध्ये बसून पर्रीकर यांनी विमानाची जवळून पाहणीही केली.
एचटीटी-40 ला भारतीय हवाई दलाचा पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य आहे. हे विमान अधिक विकसित करून त्याची निर्यात करण्यासाठी प्रयत्न करण्याचेही हिंदुस्तान एरोनॉटिक्सला स्वातंत्र्य आहे.
- मनोहर पर्रीकर, संरक्षणमंत्री
विमान निर्मितीचा प्रवास
- ऑगस्ट 2013 : विमानाचा आराखडा तयार
- मे 2015 : विमान तयार
- जून 2016 : प्रत्यक्ष चाचणी
- 2018 : सेवेत दाखल होण्याची शक्यता
एचटीटी-40 ची वैशिष्ट्ये
- 2800 किलो : वजन
- 600 किमी/तास : कमाल वेग
- 1000 किमी : पल्ला
- 6000 मीटर : उंची गाठण्याची क्षमता
- 80 टक्के : स्वदेशी सामग्री
- 75 प्रकारच्या यंत्रणा स्थानिक तंत्रज्ञांकडून विकसित