Latest News

जगातील पहिला होलोग्राफिक स्मार्टफोन तयार केल्याचा दावा

त्रिमिती दृश्यचित्रफिती व प्रतिमा कुठलाही चष्मा किंवा अन्य साधनाचा वापर न करता बघता येतील, असा होलोग्राफिक स्मार्टफोन जगात प्रथमच तयार करण्यात आल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. हा स्मार्टफोन लवचिक आहे. होलोफ्लेक्स असे या स्मार्टफोनचे नाव असून त्याच्या मदतीने कुठलेही बाह्य़ साधन न वापरता त्रिमिती प्रतिमा व चित्रपट पाहता येतात. होलोफ्लेक्समुळे स्मार्टफोनबरोबरच्या आंतरक्रिया बदलणार असून त्यामुळे वापरकर्त्यांच्या हालचालींना मर्यादा राहणार नाहीत, असे कॅनडातील क्विन्स विद्यापीठाचे रोएर व्हेर्टेगाल यांनी सांगितले. होलोफ्लेक्स स्मार्टफोनमध्ये १९२० गुणिले १०८० इतके उच्च विवर्तन असून त्यातील लाइट एमिटिंग डायोड लवचिक आहेत. त्यांना फ्लेक्सिबल ऑरगॅनिक लाइट एमिटिंग डायोड असे म्हणतात. त्यांचा वापर स्पर्श पडद्यात करण्यात आला आहे. १२ पिक्सेल रुंदीच्या वर्तुळाकार ठोकळ्यांनी त्रिमिती प्रतिमा यात शक्य आहे. हे पिक्सेल ठोकळे त्रिमिती लवचिक अशा १६००० मत्स्यनेत्रासारख्या सूक्ष्म भिंगांनी वस्तूकडे पाहतील. त्यातून १६० गुणिले १०४ विवर्तनाची प्रतिमा त्रिमिती पद्धतीने फोन केवळ गोलाकार फिरवून बघता येईल.
होलोफ्लेक्समध्ये लवचिक सेन्सर असून त्यामुळे वापरकर्ते फोन वाकवू शकतात, झेड अक्षावर वस्तू फिरत असल्याचा आभास त्यात होईल. व्हेरटेगाल यांनी सांगितले की, होलोफ्लेक्स तंत्रज्ञानाचे अनेक उपयोग आहेत. त्रिमिती प्रारूपे वापरून त्याप्रमाणे वस्तू तयार करणे शक्य होणार आहे. स्पर्शपडद्यावर बोट फिरवून एक्स व वाय अक्षावर वस्तू प्रतिमेच्या अंगाने स्थापित करता येतील तर पडद्याला पिळ देऊन झेड अक्षावर वस्तू फिरवता येईल. यात दृश्यकोन जास्त असल्याने त्रिमिती प्रारूपे एकाचवेळी अनेकांना पाहता येतील. विशिष्ट कॅमेरा वापरून होलोग्राफिक व्हिडिओ कॉन्फरन्सेस घेता येतील.
होलोग्राफिक गेमिंगसाठी त्याचा वापर करता येईल. अँग्री बर्ड्स गेम या होलोफ्लेक्सने खेळताना रबरी पट्टी ओढून पक्ष्यांच्या हालचाली वेगळ्या दिसतील, पक्षी पडद्यावर उडताना दिसतील. तिसऱ्या मितीत पक्षी पडद्यातून बाहेर उडत जाताना आभास होईल.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.