आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट अर्थात जेईईचा (अॅडव्हान्स) निकाल रविवारी जाहीर झाला. यात जयपूरचा अमन बंसल याने देशातून तर, मुंबईच्या प्रिय शहा याने राज्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर नवी मुंबईचा चिन्मय आवळे याने अनुसूचित जाती वर्गात देशातून पहिला क्रमांक पटकावला आहे.
जीईई या स्पर्धा परीक्षेतील निकालाच्या आधारावरच आयआयटी आणि अन्य प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जातो. या परीक्षेत यमुनानगरचा भावेश धिंग्रा हा देशात दुसरा तर जयपूरचाच कुणाल गोयल हा तिसऱ्या स्थानी राहिला. मुलींमधून कोटाची रिचा सिंग अव्वल आली आहे.
गत २२ मे रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेला १ लाख ५५ हजार ९४८ विद्यार्थी बसले होते. त्यातील केवळ ३६ हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
३७२ गुणांची जेईई अॅडव्हान्स परीक्षा दोन विभागांत घेण्यात येते. मुंबईच्या प्रिय शहाने २८५ गुण मिळवत देशाच्या यादीत सोळावा क्रमांक पटकावला आहे.तर राज्यात मुलींमध्ये पहिली आलेली डिंपल कोचर देशात २९५व्या क्रमांकावर आहे.