अमेरिकेनं २००३ मध्ये MOAB बॉम्ब बनवल्यानंतर २००७मध्ये रशियानं 'फादर ऑफ ऑल बॉम्ब्स' बनवला होता. 'रशियाज एव्हिएशन थर्मोबॅरिक बॉम्ब' असं त्याचं अधिकृत नाव आहे. चाचणीदरम्यान या भयंकर अस्राचा जो स्फोट झाला, त्याचा परिणाम तब्बल एक हजार फूट परिसरावर झाला होता. त्याची क्षमता ४४ टन टीएनटी स्फोटकांइतकी होती. या बॉम्बचा स्फोट हवेतच केला जातो. त्यामुळे आग भडकते आणि लक्ष्याची क्षणार्धात वाफ होऊन जाते. या अणुविरहित बॉम्बची तुलना अगदी अण्वस्त्राशीही करता येऊ शकते.
अमेरिकेच्या मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्टचं वजन ९ हजार ८०० किलो असून त्यात ११ टन टीएनटी (शक्तिशाली स्फोटक) होते. अफगाणिस्तानच्या नानगरहार परगण्यात ‘आयएस’चा मोठा तळ असून तो उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने तसेच ‘आयएस’च्या म्होरक्यांना ठार मारण्याच्या हेतूने अमेरिकेनं काल एमसी-१३० या विमानातून जीबीयू-४३ डागला होता. त्यापेक्षा किमान दुप्पट मोठा धमाका 'रशियाज एव्हिएशन थर्मोबॅरिक बॉम्ब' करू शकतो. त्यातून प्रचंड ऊर्जा निर्माण होते आणि ती नियंत्रित करणं अत्यंत कठीण असतं, असं अभ्यासकांनी सांगितलं.