वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने देशातील सेवा क्षेत्राचा व्यापार वाढविण्याच्या दृष्टीने व्हिसा नियमांमध्ये व्यापक बदल सुचविले असून या प्रस्तावावर वाणिज्य सचिव रिटा टियोटिया आणि इतर विभागातील सर्व अधिकाऱ्यांची पंतप्रधान कार्यालयात चर्चा झाल्याची माहिती सरकारी अधिका-याने दिली आहे.
व्हिसा नियमांमध्ये आम्हाला आरोग्य, पर्यटन, उद्योग क्षेत्रांसह परिसंवाद आणि परिषदांसाठी येणाऱ्या लोकांसाठी शिथिलता हवी आहे. हा विषय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील असल्यामुळे त्यांना लवकरच याविषयी निवेदन पाठविण्यात येईल, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.
भारत पर्यटक आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात मागे पडत असल्याने दरवर्षाला सुमारे ८० अब्ज डॉलरचे नुकसान देशाला सहन करावे लागत आहे. थायलंडसारख्या छोट्या देशांमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्यादेखील भारताच्या तुलनेत खुप जास्त आहे. शिवाय, मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडियासारख्या प्रमुख उपक्रमांचे यश साध्य करण्यासाठी व्हिसा पद्धती शिथीलता असण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.