नासाच्या वैज्ञानिकांनी पाच पर्यावरणस्नेही संकल्पनांची निवड संशोधनासाठी केली असून, त्या संकल्पनांचे तंत्रज्ञानात रूपांतर करता आले तर आगामी काळात विमानाला लागणाऱ्या इंधनाच्या ज्वलनातून बाहेर पडणारा धूर व इंधनाचा वापरही ७५ टक्क्यांनी कमी होणार आहे. या नव्या संकल्पनेमुळे हवाई उद्योगात अनेक बदल घडून येण्याची शक्यता आहे. नासाच्या ट्रान्सफॉर्मेटिव्ह एरॉनॉटिक्स कन्सेप्ट कार्यक्रम आखला असून, त्यात दोन वर्षे संकल्पनांवर संशोधन केले जाणार आहे. काही संकल्पनांची आगामी काळातील तंत्रज्ञाननिर्मितीकरिता निवड करण्यात आली आहे.
विद्युत विमाने, इंधनघटावर विमाने चालवणे, विद्युत मोटारींची क्षमता वाढवण्यासाठी त्रिमितीचा वापर व लिथियम -हवा यांच्या मिश्रणाच्या ऊर्जा साठवण विजेऱ्या (बॅटरी) विमानाच्या पंखांचा आकार बदलणे, रचनानिर्मितीत एरोजेलचा वापर करणे, विमानाचा अँटेना तयार करणे अशा पाच संकल्पना पुढे आल्या, त्यात तीन संकल्पनांची निवड नासाने हरित तंत्रज्ञान निर्मितीसाठी केली आहे. विमानातील इंधनाचा वापर निम्म्याने कमी करण्यासाठी या तंत्राचा वापर होणार आहे असे वैज्ञानिकांनी सांगितले. हवागतिकीशास्त्रात प्रगती घडवणारे पण प्रदूषण टाळणारे तंत्रज्ञान विकसित करणे हा आमचा हेतू आहे, असे कार्यक्रमाचे व्यवस्थापक डग रॉन यांनी सांगितले. नासाने असे म्हटले आहे, की हवाई वाहतूक क्षेत्रात पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान आणणे हा या पाच संकल्पनांची निवड करण्यामागचा हेतू आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्ष वापराची हमी आताच देता येणार नाही, पण या संशोधनातून मिळणारी माहिती आगामी काळात उपयोगाची आहे.